Type Here to Get Search Results !

पांडवकडा धबधब्यात दोन तरुण वाहून; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू

 पांडवकडा धबधब्यात दोन तरुण वाहून; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू

पनवेल,

(वार्ताहर) : खारघर येथील प्रसिद्ध मात्र धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडवकडा धबधब्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सलग दोन दिवसांत घडलेल्या या दुर्घटनांनंतर अग्निशामक दल, पोलीस आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून, वृत्त लिहिपर्यंत दोघांचाही शोध लागलेला नव्हता.

पावसाळा सुरू झाल्याने पांडवकडा धबधबा पर्यटकांनी गजबजला आहे. धबधब्याचे निसर्गरम्य सौंदर्य, हिरवाई आणि पाण्याचा प्रवाह अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे पाण्याचा वेग वाढल्याने परिसर अतिशय धोकादायक बनला आहे. पहिल्या घटनेत तळोजा फेज-१ येथील सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ राहणारा मोहम्मद (वय २०) हा तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाला. तर दुसऱ्या घटनेत मुंबईतील सांताक्रुझ (कलिना कोळीवाडी परिसर) येथील रहिवासी शेण्णोन किनी (वय १९) हा तरुण धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला.
दोन्ही घटनांनंतर अग्निशामक दल आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र पाण्याचा तीव्र प्रवाह आणि प्रतिकूल हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत असून, दोन्ही तरुणांचा शोध सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात धोकादायक धबधबे, नद्या व जलाशयांमध्ये उतरण्याचे टाळावे तसेच सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments